वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मा स्टॅन्ड   

बदलते क्रीडा विश्व : शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली

ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममधील स्टँडला माझे नाव देण्यात येणार असल्याच्या भावना शब्दांत मांडणे अवघड आहे. आवडत्या रणजी तार्‍यांची एक झलक पाहण्यासाठी ज्या स्टेडियमबाहेर उभे राहायचो, त्याचा स्टेडियममध्ये माझ्या नावाचा स्टँड असणे हे अविश्वसनीय आहे, अशी भावना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) रोहित, माजी कसोटी कर्णधार अजित वाडेकर आणि ’बीसीसीआय’ चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे वानखेडेतील स्टँडना नाव देण्यात येणार असल्याची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली.
 
तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात करता, तेव्हा अशा गोष्टी तुमच्या स्वप्नातही येत नाहीत. मी मुंबई रणजी संघाचा सराव पाहण्यासाठी या स्टेडियमबाहेर उभा राहायचो. मी २००३ किंवा २००४ ची आठवण सांगतो आहे. आमचे १४ आणि १६ वर्षांखालील संघ आझाद मैदानावर सराव करायचे. ते संपले की मी आणि माझे काही मित्र, रेल्वे ट्रॅक पार करून वानखेडेजवळ यायचो. रणजी करंडक विजेत्या संघातील आवडत्या खेळाडूंना पाहणे हा यामागचा हेतू असायचा. त्याच स्टेडियममधील स्टँडला आता माझे नाव देण्यात येणार, हे फारच अविश्वसनीय आहे. माझ्यासाठी हा सन्मान आहे असे रोहित म्हणाला.
 
क्रिकेटचा इतिहास आणि वारसा याची कोणाशीही तुलना केली जाऊ शकत नाही, असे रोहित म्हणाला. मुंबईकडून खेळायला मिळणे फार अवघड आहे. मी पहिल्यांदा मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये आलो आणि वसीम जाफर, अमोल मुझुमदार, नीलेश कुलकर्णी, साईराज बहुतुले, रमेश पोवार यांसारख्या खेळाडूंना पाहिले, तेव्हा माझे पाय थरथर कापत होते. मात्र, या सर्व अनुभवी खेळाडूंनी मला सांभाळून घेतले अशी आठवण रोहितने सांगितली.
 
सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मधील मुंबई संघातील माजी सहकारी धवल कुलकर्णीने रोहितच्या कामगिरीबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले. रोहितची गुणवत्ता सर्वांनाच ठाऊक आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत तो भारताला आक्रमक सुरुवात मिळवून देत होता. आता मुंबईसाठी त्याचा तसाच प्रयत्न आहे. 
 
मुंबई लीगच्या तिसर्‍या हंगामाला २६मे पासून सुरुवात होणार असल्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. २०१९ नंतर प्रथमच ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघांचा सहभाग असून यापैकी दोन संघ नवे असतील. सोबो मुंबई फालकन्स हा एक नवा संघ आहे.
 

Related Articles